लोणावळा : लोणावळ्यातील एका बंगल्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून १४ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तुंगार्ली परिसरात लोणावळा पोलिसांनी केली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले सर्वजण मुंबई येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस शिपाई विकास कदम यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरात एका बंगल्यात मोठ्या प्रमाणावर जुगार खेळले जात होते. प्रथम दर्शनी मूल्य असलेल्या प्लास्टिक नाण्यांचा वापर करून पत्त्यांवर जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने बंगल्यात छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जुगार खेळण्याचे साहित्य, पत्ते, रोकड असा २ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शिंदे अधिक तपास करत आहेत.