लोणावळा : राज्यात सध्या पावसाने जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच लोणावळ्यामध्ये काही दिवसांपूर्वी अन्सारी कुटुंब पाण्यात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. अशातच धोकादायक पर्यटन करणा-या बारा पर्यटकांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पावसाळ्यात अशा घटना घडत असल्यामुळे जिल्हाधिका-यांनी धोकादायक पर्यटनस्थळी जाण्याच्या संदर्भात बंदीचा आदेश लागू केला होता. तरीही लोणावळा धरण व सहारा पुलाच्या समोरील डोंगरावर असलेल्या धबधबाच्या मागील बाजूस धोकादायकपणे डोंगरात फिरणा-या सात पर्यटकांवर तसेच टायगर पॉईंटवर हुल्लडबाजी करणा-या 5 असे एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यभरात पावसाचा जोर वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस आणि वन विभाग यांची संयुक्त कारवाई गस्त घालत असताना या 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.