Lonavala crime | लोणावळा, (पुणे) : कामशेत रेल्वे स्थानकात रविवारी (ता. २४) दुपारी आढळून आलेल्या तरुणाच्या खुनाचा तपास कामशेत पोलिसांनी अवघ्या तीन तासांत लावून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.
विजय सतू भोंडवे (वय- २५, रा. भाजेगाव, नाणे मावळ, ता. मावळ) असे खून झालेल्या युवकाचं नाव आहे. तर संतोष महादेव घाटे (फिरस्ता रा. कामशेत, मावळ, मूळ. रा. अमरावती) असे खून करणाऱ्या आरोपीच नाव आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत रेल्वे स्थानकावर वर्दळीच्या ठिकाणी रविवारी भर दुपारी १२ वाजता एका २५ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलीस व लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी कामशेत पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी काही तांत्रिक बाबी व नागरिकांच्या मदतीच्या आधारे सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेतचे निरीक्षक संजय जगताप, सहायक फौजदार अब्दुल शेख, सहायक फौजदार समीर शेख, पोलीस हवालदार गणेश तावरे, सुहास सातपुते, एस. डोईफोडे, होमगार्ड सुधीर घारे यांच्या पथकाने खून करून निघून गेलेल्या आरोपीच्या अवघ्या ३ ते ४ तासात मुसक्या आवळत त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्यासोबत त्याचे इतर दोन साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
दरम्यान, कामशेत पोलिसांनी आरोपी संतोष महादेव घाटे याला पुणे लोहमार्गाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. या घटनेचा पुढील तपास आरपीएफ पोलीस ठाणे चिंचवड हे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pimpri Crime : घराचे कुलूप न तोडता चोरी ; दीड लाखांचे दागिने लंपास, असा लागला तपास..!