पुणे : सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. लोकमान्य टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट कडून हा पुरस्कार दिला जातो.
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (1 ऑगस्ट) दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते मूर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, मानपत्र, 1 लाख रुपये असे स्वरुप असणार आहे.
‘इन्फोसिस’चे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांना हा पुरस्कार यापूर्वीच प्रदान करण्यात आला असल्याने एकाच कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळणारे हे पहिलेच दाम्पत्य ठरले आहे. सुधा मूर्ती या नुकत्याच राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत. मागील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन करण्यात आला होता.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील खासदारही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.