पुणे : प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाचे ठरणारे लोहगाव विमानतळ आणि हडपसर स्टेशनला नवीन टर्मिनलकडे प्रवाशांना सहज आणि कोंडीमुक्त रस्त्याने जाता यावे. यासाठी विमानतळाला जोडणारे सात रस्ते आणि हडपसर रेल्वे स्टेशनचे तीन रस्त्यांचे रूंदीकरण करण्यासाठी ४०४ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे.
यासाठीचा महापालिका प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यासाठी कात्रज -कोंढवा रस्त्याला शासनाने दिलेल्या निधीच्या धर्तीवर या रकमेची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला या कामांसाठी किमान २०० कोटींचा निधी मिळावा, अशी अपेक्षा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पुणे महापालिकेने ऑगस्ट २०२२ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने रस्त्यांचा अभ्यास केला होता. पालिका हद्दीमध्ये समावेश झालेल्या गावांचा विकास आराखडा (डीपी) आणि प्रादेशिक आराखडा (आरपी) डोळ्यांसमोर ठेवून प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्यांची पाहणी केली होती. त्यामध्ये २.३ किलोमीटरपासून १००, ५०० मीटर लांबीचे रस्ते रखडल्याचे समोर आले होते. त्यामुळे वाहनचालकांना दूर वरून इच्छितस्थळी जावे लागत आहे.
यामुळे महापालिकेने मिसिंग लिंक जोडण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. या सल्लागार कंपनीने मुख्य शहरासह महापालिका हद्दीत समावेश झालेल्या सर्व गावांचे सर्वेक्षण करून पाहणी अहवाल महापालिकेला सादर केला आहे. सुरुवातीच्या काळात कमी अंतराचे पण नागरिकांच्यादृष्टीने महत्त्वाचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये लोहगाव विमानतळ आणि हडपसर रेल्वे स्टेशनच्या परिसरातील रस्ते वगळून अन्य ३३ रस्त्यांचा समावेश होता, सध्या १४ रस्त्यांची जोडणी झालेली आहे.
लोहगाव विमानतळावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. तसेच पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रवासी रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्याने दिवस-रात्र परिसरात मोठी गर्दी असते. या रेल्वे स्टेशनवरील भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर रेल्वे स्टेशनचा वापर सुरू केला आहे. सध्या तेथून काही गाड्या सोडल्या जात आहेत.
भविष्यात या रेल्वे स्टेशनची उपयुक्तता वाढणार असल्याने परिसरातील गर्दीतही भर पडणार आहे. त्यामुळे महापालिकेने रेल्वे स्टेशनच्या परिसरात ३ रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे.