पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घातक हत्यार बाळगणे, जबरी चोरी, धमकी देणे, दहशत निर्माण करणारे असे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नजीर सलीम शेख (वय २९, रा. हनुमान मंदिराजवळ, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नजीर शेख याच्यावर खडक पोलीस ठाण्यात २०१९ पासून जीवे मारण्याचा प्रयत्न, मारामारी, घातक हत्यारे बाळगणे, जबरी चोरी, धमकी देणे, सामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण, व्यापारी व बिल्डर यांच्याकडे खंडणी मागणे, दहशत निर्माण करणे, यासारखे ५ गंभीर गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, याच कारणास्तव त्याला २०२३ मध्ये दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपारीनंतर देखील त्याच्या वर्तनात सुधारणा झाली.
खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने यांनी आरोपी नजीर शेख याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार, आवश्यक ती पडताळणी करून, पोलीस आयुक्तांनी आरोपीला एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.