पुणे : लोणावळा ते पुणे दरम्यान आता दुपारच्या वेळेतही लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारपासून (ता. १५) दुपारच्या वेळेत सोईनुसार लोकल धावणार आहे. याबाबतचा निर्णय बोर्डाने घेतला आहे, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांना दिली. रेल्वे सुरू होणार असल्याने प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांची मोठी सोय होणार आहे.
कोरोनाची साथ सुरु होण्यापूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान लोकल गाड्यांचे संचलन व्यवस्थित सुरु होते. कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवा बंद करण्यात आली. कोरोनानंतर आता देशात पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे सुरु झाल्या आहेत. कोरोना साथीच्या अगोदर पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोन लोकल गाड्या धावत होत्या. त्या गाड्यांचे संचलन अद्याप बंद होते.
दरम्यान, दुपारच्या वेळेत रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार बारणे यांनी संसदेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने केली होती. अखेर खासदार बारणे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
याबाबत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, लोणावळा ते पुणे दरम्यान सोमवारपासून लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांची मोठी सोय होणार आहे. लोकल दुपारच्या वेळेत सुरू होणे हे सर्वांचे यश आहे.