पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्थानकातून १२ पेक्षा अधिक लोकल ट्रेन लवकरच सुटणार असल्याने विद्यार्थी, नोकरदार व अन्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, तसेच पुणे स्टेशनवरील भार देखील कमी होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
शिवाजीनगर येथील नवीन प्लॅटफॉर्मचे काम अंति टप्प्यात आले आहे. ते काम आगामी १५ ते २० दिवसांत पूर्ण होणार असून, त्यानंतर लगेचच येथून लोकसेवा सुरू होऊ शकते. पहिल्या टप्प्यात सहा लोकल शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरून सुटणार आहेत. पुणे स्टेशन येथे यार्ड रिमोल्डिंगचे (प्लॅटफॉर्म मोठा करणे) काम होणार असल्याने हा बदल करण्यात आला आहे.
रेल्वेचा प्रवास स्वस्त असल्याने या रेल्वेंना गर्दी देखील असते. गेल्या काही दिवसांपासून ही सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. परंतु लवकरच लोकल सेवा सुरळीत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे ते लोणावळा दरम्यान दररोज अनेक नोकरदार, विद्यार्थी व अन्य प्रवासी लोकलने प्रवास करत असतात. पुणे स्टेशन ते लोणावळा सध्या ४० लोकलच्या फेऱ्या सुरू आहेत. (२० जाण्यासाठी-२० येण्यासाठी) पुण्यासह पिंपरी-चिंचवड येथील शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, आयटी कंपन्या आणि एमआयडीसीमुळे दररोज लाखो प्रवासी या लोकलच्या साहाय्याने शहरात ये-जा करतात. त्यामुळे ही सेवा या नागरिकांसाठी महत्वाची आहे.