हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : मागील काही वर्षांपासून पूर्व हवेलीतील पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात परप्रांतीय मूर्तिकारांसह विक्रेत्यांनी रस्त्या-रस्त्याला थाटलेले भरमसाठ स्टॉल्समुळे ‘उदंड झाले मूर्ती स्टॉल्स’ अशीच स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक मूर्ती तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर वाढता वाहतूक खर्च, खरेदीची वाढलेली किंमत आणि त्याचा विक्रीवेळी मेळ घालणे अवघड झाले आहे.
लोणी काळभोर, उरुळी कांचन सारख्या मोठ्या गावामध्ये पुणे, हडपसर, पुरंदर, दौंडसह परिसरातील तालुक्यातून वाढलेली आवक, त्यात, यंदा अधिक मासामुळे महिनाभर उशिराने गणेशोत्सव होणार आहे. त्याचेही परिणाम दिसून येत आहेत. पूर्वी कुंभार समाजातील मूर्तिकर गणेशमूर्ती तयार करायचे व त्याची विक्रीही करीत होते. त्याच मूर्तीची घरोघरी पूजा केली जायची. हा काळ आता मागे पडला आहे. कुंभार समाजाबाहेरील मूर्तिकारांची संख्या वाढत आहे. तथापि, आजही प्रामुख्याने कुंभार समाजातील मूर्तिकार आहेत. मात्र, विक्रेते सर्व समाजातील आहेत.
लोणी काळभोर कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात विस्तारलेली गावे, गणेशोत्सवाला आलेले उत्सवी आणि व्यावसायिक स्वरूप मूर्तीची घासाघीस करून खरेदी करण्यामुळे कधीकाळी कुंभार गल्लीत जाऊन श्रद्धेने मूर्ती खरेदी करण्याचा ‘तो’ काळ मागे पडला आहे.
दरम्यान, पुणे – सोलापूर महामार्गावरील सर्व प्रमुख बाजारपेठांचे रस्ते १५-२० दिवस आधीपासूनच स्टॉल्सनी सजले आहेत. वाढत्या बेरोजगारीमुळेही स्टॉल्सची संख्येत वाढ झाली आहे. या हंगामी व्यवसायात कमाईसाठी सर्वांचे प्रयत्न सध्या दिसून येत आहेत.
भाविक आता ‘ग्राहक’ झालाय; व्यापाऱ्यांची भावना..
याबाबत बोलताना श्री दत्त आर्ट, उरूळी कांचन येथील व्यावसायिक शरद कुंभार म्हणाले, “यंदा अधिक महिन्यामुळे स्टॉल्स, विक्रेत्यांची संख्याही वाढली आहे. भाविक आता ‘ग्राहक’ झाला आहे. त्याचे प्रतिकूल परिणाम मार्केटवर दिसत आहेत. सार्वजनिक मंडळांकडून पूर्वी महिनाभर आधी ‘श्री’च्या मूर्तीचे बुकिंग व्हायचे. मात्र, आता त्यांच्याकडून ऐनवेळी खरेदी केली जात आहे. घरगुती मूर्तीचे दर ३०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत आहेत. वाढता वाहतूक खर्च आणि मूर्तीचे वाढलेले दर पाहता विक्रेत्यांपुढे आव्हान आहे.”
मूर्तीच्या दरात वाढ..
अधिक मासामुळे वाढलेले उत्पादन, विक्रेत्यांची वाढलेली संख्या, दुष्काळी परिस्थितीचे उत्सवावरील सावट एकूणच ‘श्री’च्या उत्सवावर परिणाम करणारे घटक आहेत. यंदा सरासरी दहा ते पंधरा टक्क्यांनी किमतीत वाढ आहे. घरगुती मूर्तीचे दर सरासरी तीनशे रुपयांपासून पुढेच आहेत.
पुणे – सोलापूर महामार्गाच्या बाजूला असंख्य विक्रेते..
पुणे – सोलापूर महामार्गाच्या बाजूला हडपसर, मांजरी, शेवाळेवाडी, लोणी काळभोर, कुंजीरवाडी परिसरात झोपड्या करून राहिलेले व्यावसायिक हे १२ महिने विविध मूर्ती तयार करतात. यामध्ये गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात गणपती तयार करणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांची संख्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.