पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याच्या प्रतीक्षेत सर्व स्थानिक नेते आहेत. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यावर असलेल्या निर्बंधांसंदर्भात समाधानकारक कारण नसेल, तर निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी महत्वपूर्ण टिपण्णी केली आहे. त्यामुळे निवडणुका लवकर होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे, असं असतानाच आता महाविकास आघाडीच्या एका नेत्याने निवडणुका पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासंदर्भात संकेत दिले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्यात याव्यात, अशी आमचीही अपेक्षा आहे. सदृढ लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं हे अत्यंत चुकीचं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सुधारित अध्यादेश काढला जाणार असल्याची चर्चा आहे. अनेक वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत, लोकप्रतिनिधी नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केवळ प्रशासकीय अधिकारी आणि पालकमंत्र्यांची एकाधिकारशाही निर्माण होत आहे.
लोकाभिमुख विकासाची चाके थांबली आहेत. अशी स्थिती असताना सरकार मात्र अद्यापही निवडणुका पुढे ढकलत आहे हे योग्य नाही, निवडणुकीची सत्ताधारी पक्षाला एवढी भीती का वाटतेय? केवळ संविधान आणि लोकशाहीचं नाव न घेता सरकारने तत्काळ निवडणुका घोषित करून लोकशाहीचा आणि संविधानाचा सन्मान करावा, असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सुधारित अध्यादेश काढला जाणार असल्याची चर्चा आहे. अनेक वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत, लोकप्रतिनिधी नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केवळ प्रशासकीय अधिकारी आणि पालकमंत्र्यांची एकाधिकारशाही निर्माण होत असून लोकाभिमुख…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 9, 2024