पुणे : अंमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. या संमेलनाला वाचकांची पुरेशी उपस्थिती नव्हती. संमेलनाला वाचकांचा खूप कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुस्तक प्रदर्शनात पुस्तकांची पुरेशी विक्री देखील झाली नाही. पुस्तक विक्रीला जो माहोल निर्माण व्हावा लागतो, तो निर्माण झाला नाही. परिणामी प्रदर्शनाच्या भरलेल्या भाड्याची पूर्ण रक्कम परत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने स्वागताध्यक्ष गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. रक्कम परत दिली नाही तर पुढच्या वर्षी संमेलनावर बहिष्कार घालण्याची धमकी प्रकाशकांनी दिली आहे.
प्रकाशक संघाची बैठक सोमवारी (ता. ५) पुण्यात झाली. त्यामध्ये प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष दत्तात्रय पाष्टे आदी उपस्थित होते. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. अंमळनेर हे खूप छोटे शहर आहे. तेथे सुमारे २७५ गाळे पुस्तक विक्रेत्यांसाठी दिले होते. हे असंयुक्तिक असल्याची चर्चा होती. शिवाय संमेलनाच्या स्थळापासून पुस्तकांचे गाळे खूप लांब होते. श्रोते एवढ्या लांब जायचा कंटाळा करत होते. त्यामुळे पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला नाही. संमेलनालाही म्हणावी तशी गर्दी झाली नाही. त्यात जी मंडळी आली ती लांबवरच्या स्टॉलवर फार कमी वेळ होती. परिणामी पुस्तक विक्रीसाठी जो माहोल निर्माण व्हावा लागतो, तो निर्माण झाला नाही. गावोगावच्या अनेक गरीब प्रकाशकांनी साहित्य संमेलनात स्टॉल लावले होते. त्यांचे नुकसान झाले आहे.
अंमळनेरच्या साहित्य संमेलनात प्रत्येकाला किमान १० ते १५ हजार रूपयांच्या पुस्तकांची विक्री होईल, असे वाटत होते. परंतु, केवळ पाचशे ते हजार रूपयांची देखील विक्री झाली नाही. त्यामुळे सर्व प्रकाशकांचे नुकसान झाले, असे निवेदनात नमूद आहे. कोणी दुःखाने, कोणी संतापाने, आज प्रत्येक स्टॉलधारक, प्रकाशक हा संघाकडे आपले गाऱ्हाणे मांडत आहे. त्यामुळे आम्ही बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. अशी परिस्थिती अपवादात्मक आहे, असे मत मराठी प्रकाशक संघाने व्यक्त केले आहे.
यापूर्वी परळी वैजनाथ येथील संमेलनात पाऊस झाला होता. तेव्हा नुकसानभरपाईपोटी तत्कालीन स्वागताध्यक्ष स्व. गोपीनाथ मुंडे यांनी स्टॉलधारकांना ५ हजार रूपयांचा चेक दिला होता. त्याचप्रमाणे यंदा प्रकाशकांनी भाड्यापोटी भरलेली रक्कम परत द्यावी, अशी मागणी संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी केली आहे.