राजेंद्रकुमार शेळके
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १५ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन ११ मार्च रोजी शिवस्मारक नाट्यगृह सोलापूर येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले यांची सर्वानूमते निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिध्द साहित्यिक शरद गोरे यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहास व साहित्यिक पैलूचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. उद्घाटन समारंभ परिसंवाद, कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असून, राज्यभरातील मोठ्या संख्येनी साहित्यिक या संमेलनास हजेरी लावणार आहेत.
तुका म्हणे (कोश) गावरंग, गावजागर, परिघावरच्या पाऊलखुणा, ग्रामीण साहित्य आणि वास्तव, लोक संस्कृतील स्त्रीरूपे, आस्थेची माणसं, लोकवाणीतील अमृतधन, माणदेशी साहित्य, यासह १५ ग्रंथाचे लेखन डॉ. कृष्णा इंगोले यांनी केले असून, आजवर विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच रवींद्र खंदारे (सातारा), कृष्णकांत चव्हाण (सोलापूर), राजू म्हस्के (बीड), प्रा. इंद्रजित पाटील (बार्शी), दस्तगिर जमादार (सोलापूर) यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.