पुणे : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. देशातील मोठमोठी शहरे दिव्यांनी उजळली आहेत. नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. अयोध्येच्या सोहळ्याचा मुहूर्त जवळ आला आहे. या सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशातही दिसत असून, पुणेकरही यासाठी सज्ज झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात एक महत्वाची मागणी करण्यात आली आहे. २२ जानेवारीला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासे शॉप दुकान बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी संघर्ष सेनेतर्फे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. यादिवशी देशामध्ये उत्साहाचे, आनंदी वातावरण रहावे. यामुळे सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासेविक्री दुकाने एका दिवसासाठी बंद ठेवावीत, अशी मागणी संघर्ष सेनेने पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा अधिकारी, पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर राम मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. पुणेकरांना रामलल्लाचे दर्शन घेता यावे यासाठी पुण्यातून अयोध्येसाठी ३० जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. दोन दिवसांतून एक गाडी पुण्यातून अयोध्येसाठी सुटणार आहे. त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अयोध्येला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी भक्तांकडून केली जात होती, त्यानुसार रेल्वे प्रशासनातर्फे हा निर्णय घेत ला आहे. रेल्वे बोर्डाने पुण्यातून ३० जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात १५ विशेष रेल्वे अयोध्येसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका गाडीमध्ये साधारण दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकणार आहेत.