पुणे : पुण्यातील सारसबाग येथील नवसाला पावणारा अशी ओळख असणाऱ्या गणपतीला दरवर्षी थंडीच्या दिवसात स्वेटर आणि टोपी घातली जाते. या वर्षी देखील थंडीचा कडाका वाढला की गणपती बाप्पाला स्वेटर आणि टोपी परिधान केली आहे. त्यामुळे दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करताना दिसत आहेत.
गेल्या सहा दिवसांपासून पुणे शहराचा पारा दहा अंशांच्या खाली गेल्याने अवघे शहर गारठले आहे. त्यामुळे शनिवारी सारसबागेतील श्रीसिध्दिविनायकाला उबदार लोकरीचे स्वेटर, टोपी घालण्यात आले होते.
शनिवारी शिवाजीनगरचा पारा ९.७ अंशांवर खाली गेला होता. त्या आधी सतत पाच दिवस हा पारा ९.२ ते ९.५ अंशांवर होता.
हिमालयात हिमवर्षाव सुरू असल्याने तिकडून शहरात शीतलहरी येत आहेत. तर दक्षिण भारतात पाऊस सुरू झाल्यामुळे मोठ्याप्रमाणावर बाष्प येत आहेत. त्यामुळे शहर दिवसभर गारठलेले आहे. सायंकाळी ५ वाजताच वातावरणात गारठा तयार होतो. रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत बारा तास किमान तापमानात आणखी घट होत आहे. पहाटे दाट धुके असल्याने नागरिक उशिरा बाहेर पडत आहेत.