पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी गुंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे पुरवणी जबाबात सांगितले आहे. याबाबतची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी न्यायालयात दिली. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यासंबंधीचा गोपनीय अहवाल देखील न्यायालयात सादर केला आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील फरारी मुख्य आरोपी गणेश मारणे याला पोलिसांनी बुधवारी 31 जानेवारीला रात्री पाठलाग करून संगमनेरजवळ अटक केली. या गुन्हयातील 15 आरोपींसह गणेश मारणे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याने मारणे याला गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी विशेष मोक्का न्यायाधीश व्ही. आर. कचरे कोर्टात हजर करण्यात आले.
यावेळी सुनील तांबे यांनी सांगितले की, आत्तापर्यंत या गुन्ह्यात एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोघे मुख्य सूत्रधार असून, या दोघांनीच खुनाचा कट रचला. पाच जानेवारीला शरद मोहोळचा खून झाल्यापासून गणेश मारणे फरार होता. या काळात बंगळुरू, ओडिशा केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या पाच राज्यात तो फिरला असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. तसेच शरद मोहोळचा खून केल्यानंतर ‘आम्ही गणेश मारणेची पोरं आहोत, असे आरोपींनी सांगितले आहे.
फिर्यादीमध्ये गणेश मारणे याचे नाव असून यापूर्वी त्याच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत. हे गंभीर गुन्हे बघता आरोपीला जास्तीत जास्त पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. गणेश मारणे याच्यावतीने ॲड. राहुल देशमुख यांनी बाजू मांडली. आरोपीवर 2008 नंतर एकही दखलपात्र गुन्हा नाही.
पोलिसांकडून आम्ही गणेश मारणेची पोरं आहोत, असे आरोपी सीसीटीव्हीमध्ये म्हणत असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व सीसीटीव्हीचे फुटेज युट्यूबवर व्हायरल झाले आहेत. मात्र आरोपी असे काही बोलताना यामध्ये दिसले नाहीत. आरोपीला या कटात अडकवण्यात आले आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गणेश मारणेला न्यायालयाने नऊ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.