हडपसर : काळेपडळ येथील सामाजिक कार्यकर्ता सचिन शेलार याच्या खूनातील बारा सराईत आरोपींना न्यायालयाने जन्मठेप व पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक वर्षाचा कारावास अशी शिक्षा देण्यात आली आहे. पुणे विषेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हे आदेश दिले आहेत.
दरम्यान, २०२४ मध्ये पहिल्यांदाच सर्व आरोपींना मोक्कासह जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच दंड भरल्यानंतर त्यातील १० लाख रुपये मृताच्या वारसांना देण्यात यावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
अनिल तुकाराम सोमवंशी (वय-२९) अमित अर्जुन फल्ले (वय-३०), अण्णा उर्फ सुभाष राख (वय-३५) गणेश चव्हाण (वय-२३, सर्व रा. काळेपडळ), पिंट्या उर्फ धनंजय आनंद व्हनगरे (वय-२३, रा. हांडेवाडी रोड, हडपसर), पिंक्क्या उर्फ आशुतोष अशोक बुट्टे- पाटील (वय-२८, रा. उरळी कांचन) धीरज अनिल ढगारे (वय-२०, रा. ससाणे नगर), अनिल बापू माने (२३, रा. ओंकार कॉलनी), राजेंद्र रावसाहेब कांबळे (२९, रा. गोसावी वस्ती, हडपसर), अमित चंद्रकांत घाटगे (वय-२५, रा. शेवाळवाडी फाटा), बाळासाहेब भगवान हरणे (वय-२२, रा. भेकाराई नगर), जग्गनाथ उर्फ केरबा चौघुले (वय-२६, रा. हांडेवाडी रोड, हडपसर ) अशी बारा जणांची नावे आहेत.
आरोपींनी सामाजिक कार्यकर्ता सचिन शहाजी शेलार (वय-३२, रा. ओंकार कॉलनी, काळेपडळ, हडपसर) यांचा २७ सप्टेंबर २०१४ रोजी खून करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांचा मित्र मनोज कदम (वय-२४, रा. हडपसर) याने फिर्याद दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सचिन शेलार हा सामाजिक कामात असल्याने त्यांची हडपसरच्या काळेपडळ भागात प्रसिद्धी वाढत होती. तर, आरोपींना त्याचे वर्चस्व नको होते. त्यातून त्यांच्यात वादावादीही झाली होती. मयत शेलार यांनी आरोपींना काही वेळा मारहाण देखील केली होती. याचाच राग मनात धरून एक महिन्यापासून आरोपी त्यांचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होते.
त्यानुसार बारा जणांनी मिळून कोयत्याने वार करून सचिन शेलारचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील उज्वला पवार यांनी पाहिले. वानवडीचे सहाय्यक पोलीस आयुक्त भोगले यांनी तपास केला.