पिंपरी : ‘चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, मुखी म्हणतां चुकती फेर, तुम्हां जन्म नाही एक, तुका म्हणे माझी भाक’ या भावनेने राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो वैष्णवांची मांदियाळी कार्तिकी वारी सोहळा अनुभवण्यासाठी आळंदीत दाखल झाली आहे. अखंड माऊली नामाचा जयघोष करत आलेल्या लाखो वैष्णवांची पावले माउलींच्या संजीवन समाधीदिन सोहळ्यासाठी गेली चार दिवसांपासून विसावली आहेत. शहरात सर्वच रस्त्यांवर वारकऱ्यांचा उत्साह दिसत आहे. हरिनामाच्या गजराने आळंदी दुमदुमली आहे. इंद्रायणी नदी तीरावर वैष्णवांचा मेळा आनंदाने नाचत आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात दाखल झाले आहेत. पवित्र इंद्रायणीत स्नान करून माऊलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी दर्शन रांगेत आले आहेत. या वेळी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन आलेल्या वारकऱ्यांनी भावना व्यक्त करत या सरकारला सद्बुद्धी द्यावी, त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत, असे साकडे घातले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा १२ डिसेंबरपर्यंत साजरा होणार आहे. या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व आहे. ‘यात्रे अलंकापुरी येतील, ते आवडती विठ्ठला,’ या संतवचनाची आठवण मनात बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवर हरिनामाचा गजर चालू आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींच्या संजीवन समाधी मंदिरात पहाटे दोनपर्यंत ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात पवमान अभिषेक, दुधारती करण्यात आली. सनई चौघड्याच्या सुरावटीने समाधी मंदिरातील वातावरण मंगलमय झाले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त अॅड. विकास ढगे-पाटील, योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, अॅड. राजेश उमाप यांच्या हस्ते मान्यवरांना नारळाचा प्रसाद देण्यात आला. पूजेच्या मानकऱ्यांना ज्ञानेश्वरीची प्रत आणि पसायदानाची प्रतिमा भेट देण्यात आली. माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवण्यात आला होता. त्यांचे मनमोहक रूप साकारण्यात आले होते. दुपारी महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर श्रींच्या पालखीची आणि रथाची नगरप्रदक्षिणा झाली. या वेळी संपूर्ण मार्गावर माउलींच्या नामाचा गजर चालू होता. वीणा मंडपात बाबासाहेब देहूकर आणि वासकर महाराजांची कीर्तनसेवा झाली. त्याचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला.
यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील परतवाडी गावच्या शेषराव सोपान आडे आणि त्यांच्या पत्नी गंगुबाई या दाम्पत्याला मिळाला. त्यांना माउलींच्या कृपेमुळे सेवेची संधी मिळाली, अशी भावना आडे दाम्पत्याने व्यक्त केली.