युनूस तांबोळी
शिरूर : इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम मशीन) आजही अनेक गैरसमज आहेत. मात्र, हे यंत्र कोणत्याही हस्तक्षेपापासून अलिप्त, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ससज्ज, स्वतःची कार्यक्षमता ओळखण्याच्या क्षमतेने सुसज्ज, रेडीओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून माहितीचे आदान-प्रदान करणारे, गुप्त आणि सुरक्षित निवडणुकींचा आधुनिक मंत्र आहे. शिरूर तालुक्यात तहसील कार्यालयाच्या वतीने इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्राबाबत प्रशिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे.
कवठे येमाई (ता. शिरूर) येथे नुकताच जनजागृती रथ आला होता. इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्राची (ईव्हीएम मशीन) जनजागृती या वेळी करण्यात आली. या वेळी कामगार तलाठी ललिता वाघमारे, पूजा चव्हाण, गणेश कठारे, सूरज बेंडभर, पोलीस कर्मचारी एम. बी. मांडगे, लहू सांडभोर आदी उपस्थित होते.
इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्राद्वारे (ईव्हीएम मशीन) मतदान केल्यानंतर काही सेकंदात मशीनवर चिन्ह दिसून त्याची चिठ्ठी मशीनमध्ये पडते. त्यामुळे केलेले मतदान चिठ्ठीद्वारे मोजून घेता येते. ही नवीन पद्धत विकसित केली आहे. त्यातून इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्रावर (ईव्हीएम मशीन) संशय व्यक्त करता येणार नसल्याचे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
जनजागृती मतदारांपर्यंत पोहोचावी…
सध्या ज्वारी पिकाची काढणी तसेच कांदा पिकाच्या खुरपणीचे दिवस आहेत. त्यामुळे नागरिक सकाळी आणि संध्याकाळी गाव अथवा वाडी-वस्तीवर असतात. दुपारी हा जनजागृतीचा रथ फिरत असल्याने सर्वसामान्य मतदारांपर्यंत इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्राची (ईव्हीएम मशीन) माहिती पोहचत नाही. त्यामुळे हा जनजागृतीचा रथ सकाळी अथवा सायंकाळी गावागावात फिरवावा. त्यातून मतदानाविषयी जनजागृती होण्यास मदत होईल, अशी चर्चा मतदारांमध्ये आहे.