मंचर : येथील सीताराम लोंढे यांच्या ‘गणराज मंगल कार्यालयाच्या मागे असलेल्या शेतात दिवसाढवळ्या बिबट्या फिरत असताना दिसला. आतापर्यंत साधारण आडरस्ता किंवा ऊसाच्या शेतात तेही रात्री बिबट्याचे दर्शन व्हायचे. मात्र, हा भर दिवसा शेतात फिरताना दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्या शेतात फिरतानाचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये काढला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या परिसरात पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. आंबेगाव तालुक्यातील बागायत गावांमधील ऊस तोडणी जवळपास पूर्ण झाली असल्याने बिबट्याचे क्षेत्र कमी झाले आहे. तसेच सध्या उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात वाढल्याने आणि उकाड्यामुळे पाण्याच्या शोधात बिबटे ऊसाच्या शेतातून दिवसा बाहेर येताना दिसत आहे. मंचर येथील गणराज मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस पूर्ण वाढ झालेला, बिबट्या मोकळ्या शेतात फिरत आहे. दरम्यान, या परिसरात बिबट्या दिवसाढवळ्या दिसल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.