खोडद (पुणे): मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील खंडागळे मळा येथे शेतकरी खंडू रखमा खंडागळे यांच्या घराच्या समोरील गाईच्या गोठ्यांच्या बाजूला दबा धरून बसलेला बिबट्या घराच्या ओट्यावर येऊन घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुलीने पाहिले, या वेळी आरडाओरड केल्याने बिबट्याने ऊसात धूम ठोकली.
या घटनेची माहिती मांजरवाडी गावचे पोलीस पाटील सचिन टाव्हरे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे यांना दिली. त्यांनी लगेच वन विभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांना फोनद्वारे माहिती दिली व तत्काळ त्या ठिकाणी पिंजरा लावण्याचे सूचना दिल्या. उपवनसंरक्षक अमोल सातपुते वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली १९ रोजी सकाळी आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी ताबडतोब पिंजरा आणून भक्ष्य म्हणून शेळी ठेवली आहे.
पिंजरा लावण्याकरिता मांजरवाडीचे उपसरपंच संतोष मोरे, किरण मस्के, स्वप्निल खंडागळे, श्रीकृष्ण निकम, सुखदेव खंडागळे, बाळासाहेब खंडागळे, सुभाष खंडागळे, सूरज खंडागळे, तुषार टेके व खंडू खंडागळे यांनी विशेष मदत केली. घरालगत ऊसाचे मोठे क्षेत्र असल्याने या भागात बिबट येऊ नये म्हणून करावयाची कार्यवाही याची वन विभाग यांच्या मार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
मुलीच्या ओरडण्याने बिबट्या पळाला
रिद्धी खंडू खंडागळे या मुलीने ओरडून आवाज केल्याने वडिलांनी मोठी काठी फेकून मारली व आरडाओरडा केल्याने बिबट्याने घरालगत असणाऱ्या बाजूच्या ऊसात धूम ठोकली. या वेळी घरातील सर्व नागरिक सतर्क असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.