युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्या दहशत सुरूच आहे. जांबुत, पिंपरखेड या ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना ताजी असतानाच, वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथील शेती कामासाठी व काटेरी झाडे तोडण्यासाठी आलेल्या मजुरावर बिबट्याने सोमवारी ( ता. ५ ) मध्यरात्री हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.
हरिश्चंद्र बारकू वाघमारे (मुळगाव रोहा, जिल्हा रायगड) असे जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वाघमारे हे एकनाथ दामू निचित यांच्या शेतात कोपी बांधून हे कुटूंब राहत होते. वाघमारे हे मध्यरात्री लघवीसाठी बाहेर आले होते. त्यानंतर ते परत कोपित प्रवेश करत असताना, अचानक बिबट्याने पाठीमागून पायाच्या घोट्याला पकडले. वाघमारे यांनी पाय जोरात खेचून घेतला व मोठ्याने आवाज केला. नंतर त्यांनी घरातील भांड्यांचा आवाज केला. त्या आवाजाने बिबट्या निघून गेल्यामुळे ते बचावले.
दरम्यान या घटनेची माहिती वन विभागास कळविल्यानंतर वनपाल गणेश पवार, वनरक्षक सविता चव्हाण व ऋषिकेश लाड यांनी वाघमारे यांना टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या परिसरातील बिबट्याची नागरिकांवर हल्ला करण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी जांबुत, पिंपरखेड या ठिकाणच्या घटना ताज्या असतानाच ही तिसरी घटना घडल्याने या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या भागात बिबट्यांचे प्रमाण वाढले असून बेट भागातील टाकळी हाजी, माळवाडी, वडनेर, कवठे येमाई, मलठण या गावातही अनेक वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
याबाबत बोलताना शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर म्हणाले, शिरूर तालुक्याच्या बेट भागात बिबट्यांची संख्या वाढली आहे. पिंजरा व कॅमेरे लावून त्यांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी वाडी वस्तीवर घराबाहेर पडताना हातात काठी किंवा मोबाईलवर गाणी लावली पाहिजे. एकट्याने घराबाहेर पडू नका. कोपी करून राहणाऱ्या मानव वस्ती लगत रहावे. रात्रीच्या वेळी बाहेर पडू नका. असे आवाहन म्हसेकर यांनी केले आहे.