जुन्नर : जुन्नर परिसरातील बिबट्यांची वाढलेली संख्या पर्यटन वाढीसाठी उपयोगी असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे जुन्नरमध्ये बिबट सफारी सुरु करण्यासाठी कमालीचे आग्रही होते. त्यादृष्टीने सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा सुरु होता. अखेर पवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे. यामुळे जुन्नर वनक्षेत्रातील बिबट सफारीचा मार्ग खुला झाला आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना आमदार अतुल बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण वनक्षेत्रात बिबट सफारी उभारण्यास दिलेली मान्यता ही सविस्तर प्रकल्प आराखडा तसेच प्रकल्प आराखडा मांडणी अहवालास नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मान्यतेला अधिन राहून दिली आहे. या प्रकल्पाच्या ८० कोटी ४३ लाख २३ हजार रुपये खर्चास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हा रस्ता बिबट्या तसेच वन्यप्राण्यांसाठी तयार केलेले पाणवठे तसेच त्यांच्या अधिवासाजवळून जाणार असल्याने पर्यटकांना बिबट वन्यप्राणी जवळून पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. सफारीमध्ये पर्यंटकांना फिरण्यासाठी २० ते २५ आसन क्षमता असलेल्या सुरक्षित तसेच बंदिस्त बस खरेदी करण्यात येणार आहेत.
बिबट सफारीमध्ये पर्यटक व बिबट वन्यप्राणी यांच्या सुरक्षिततेसाठी दुहेरी प्रवेशद्वार तयार करण्यात येणार आहे. हे प्रवेशद्वार विद्युत स्वयंचलित व सेन्सर असलेले असणार आहे. सफारीमध्ये २.६ किलोमीटर लांबीचा अंतर्गत रस्ता तयार करण्यात येणार आहे. बस सफारी मार्गावरुन विहित वेळेत पर्यटकांसह मार्गक्रमण करतील, हा वेगळा अनुभव असणार आहे, अशी माहिती आमदार बेनके यांनी दिली.