भोर : भाटघर जलाशयाच्या पश्चिमेकडील ३२ गाव खोऱ्यातील वाढाणे (ता.भोर) येथे आठ दिवसांमध्ये कालवड व खोंडाचा बिबट्याने फरशा पाडल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाढाणे येथील जंगल परिसरात बिबट्याचा वावर मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वाढला आहे. बिबट्याने मागील आठ दिवसांपूर्वी गायीच्या कालवडीवर हल्ला करून ठार केली होती. तर गुरुवार (दि.२८) रानात शेतकरी राजेंद्र गुलाब बोडके यांची जनावरे चरत असताना जनावरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून एक खोंड जंगल परिसरात ओढून नेत ठार केले. शेतकऱ्याने इकडे तिकडे खोंडाचा शोध घेतला. मात्र काही तासांनी खोंड शेतकऱ्याला झाडाझुडपात मृत अवस्थेत आढळून आले. वाढाणे परिसरात सध्या बिबट्याच्या वारंवार पाळीव जनावरांवर होणाऱ्या हल्ल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.