पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. अश्यातच आता कात्रज घाटातही बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचे समोर आले आहे. भिलारेवाडी येथील गॅरेज व्यावसायिक सय्यद सैफ व सहकारी साजिद शेख हे चारचाकी मधून जात असताना काल रविवारी (ता.08) रात्री आर्यन स्कूलजवळ असलेल्या क्रेशर परिसरात त्यांना बिबट्या बसल्याचे निर्दशनास आले.
यावेळी त्यांनी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये बिबट्याचा व्हिडिओ आणि फोटोही काढला आहे. आम्ही दोघे चारचाकीमधून जात होतो. त्यावेळी बिबट्या त्या जागी निवांत बसलेला दिसून आला. आम्ही आल्याची बिबट्याला चाहूल लागताच बिबट्याने तिथून पळ काढला असल्याचे सैफने सांगितले.
दरम्यान, कात्रज घाटातील बिबट्याच्या दर्शनामुळे कात्रज घाटांस गुजर- निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी आदी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. काही दिवसांपूर्वी भिलारेवाडी आणि गुजर- निंबाळकर वाडीच्या हद्दीतही स्थानिक नागरिकांच्या नजरेस बिबट्या पडला होता.
या संदर्भात वन अधिकारी संभाजी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र कात्रज घाट आणि परिसर हे वनक्षेत्र आहे. या भागात याआधीही बिबट्या सदृश्य प्राणी दिसून आलेले आहेत.