चाकण : चाकण बाजारपेठेत बिबट्या घुसल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी (ता.१५) सकाळच्या सुमारास घडली आहे. बिबट्या भरवस्तीत घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. मात्र वन विभागाने तब्बल पाच तासाच्या अथांग प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश मिळविले आहे. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण बाजारपेठेत बिबट्या घुसल्याची माहिती समजताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. आणि हि माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
या घटनेची माहिती मिळताच, वन विभाग, पोलीस दल तसेच रेस्क्यु टिम बाजारपेठेत दाखल झाले. परंतु गर्दीमुळे बिबट्याला पकडण्यात पथकास अडचण निर्माण झाली. गर्दी हटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळापासून लांब जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी प्लॅन आखला.
दरम्यान, माणिकडोह बिबट निवारा केंद्राची रेस्क्यु टिम आणि स्थानिक वन विभाग रेस्क्यु टिमने प्लॅननूसार कार्यरत राहिली. बिबट्याला बंदुकीच्या सहाय्याने भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले.
व बिबट्याला प्राथमिक उपचारासाठी बिबट्या निवारा केंद्रात पाठविण्यात आले आहे.