आणे (पुणे): बेल्हे (ता. जुन्नर) येथील दत्तनगरमध्ये विष्णू मटाले या शेतकऱ्याच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये सोमवारी (दि.१३) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये या शेतकऱ्याच्या तीन शेळ्या व दोन बोकड बिबट्याने फस्त केले. तीन शेळ्या गोठ्यात फस्त केल्या, तर दोन बोकड शेजारच्या शेतामध्ये नेऊन बिबट्याने फस्त केले.
शेतकऱ्यांच्या गोठ्याला आठ ते दहा फुटाच्या उंचीचे तारेचे कंपाऊंड होते. हे कंपाऊंड तोडून बिबट्याने आत प्रवेश केला. या हल्यात ६५ ते ७० हजार रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाने शेतकऱ्याच्या कुटुंबातील सर्वांना अश्रू अनावर झाले होते. जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यास वन विभाग अपयशी ठरत आहे.
या शेतकऱ्याला तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी बेल्हेतील सामजिक कार्यकर्ते दत्ता खोमणे, सावकार पिंगट, देविदास मटाले यांनी केली आहे. संबंधित घटनेचा वन विभागाने पंचनामा केला असून स्थानिक शेतकऱ्यांना बिबट्यापासून संरक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.