पोपट पाचंगे
कारेगाव (पुणे): ढोकसांगवी (ता.शिरुर) येथील प्रगतिशील शेतकरी राजाराम भागुजी मलगुंडे यांच्या शेतात विजेचा धक्का लागून बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली. बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
हा बिबट्या दीड ते दोन वर्ष वयाचा (मादी) आहे. मलगुंडे यांचे अभंग मळा येथे शेत असून, या शेतात आज सोमवारी (दि.१७) सकाळी बिबट्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती रविंद्र मलगुंडे यांनी शिरुरचे वनपाल भाऊसाहेब शिंदे यांना दिल्यानंतर त्यांनी वन विभागाचे कर्मचारी जयेश टेमकर व वनरक्षक सविता चव्हाण, तसेच महावितरणचे शाखा अभियंता दिपक पाचुंदकर, वायरमन वैभव शेवाळे व नामदेव घरत यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेची सविस्तर माहिती घेऊन वनपाल शिंदे यांनी पंचनामा केला. त्यानंतर बिबट्याला शिरुर येथील वन विभागाच्या कार्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. दरम्यान,मलगुंडे यांच्या याच शेतात गेल्या आठवड्यात ऊसतोडणी सुरु असताना तीन बिबट्याचे बछडे आढळून आले होते.