पुणे : बिबट्याच्या नखांपासून तयार केलेले लॉकेट घालण्याची हौस तीन अल्पवयीन मुलांना चांगलीच महागात पडली आहे. वनविभागाने तीघांवर गुन्हा दाखल केला आहे. हवेली तालुक्यातील मौजे वडगाव गावातील नवनाथ खांदवे यांच्या शेतात मृत बिबट्या आढळला होता. मुलांनी थेट मृत बिबट्याचा पंजा कापला. या भागात बिबट्यांच्या नखाची आणि कातडीची तस्करी केल्याचे प्रकार कायम समोर येत असतात.
मौजे वडगाव गावातील नवनाथ खांदवे यांच्या शेतात कुत्र्याच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाला होता. ऊस तोडणी सुरु असताना तिघांना मृत बिबट्या दिसला. खांदवे यांना मृत्यू बिबट्याची माहिती मिळताच त्यांनी यासंदर्भात वनविभागाकडे तक्रार केली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत मादी बिबट (वय 10 महिने) ताब्यात घेतले. त्यानंतर मृत बिबट्याची तपासणी केली असता, त्याचे पुढील उजव्या पायाची 3 नखे तसेच मागचा उजव्या पायाचा पंजा गायब असल्याचे दिसून आले.
वन अधिकाराऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, उसतोडणी कामगारांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. शेवटी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी त्यांनी प्रत्येकाची वेगवेगळी चौकशी केली. त्यावेळी त्यांना एका अल्पवयीन मुलाने संपूर्ण घटनेची माहिती दिली. आपल्या वडिलांच्या आणि 2 अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृत बिबट्याची 3 नखे आणि पायाचा पंजा व त्याचे 1 नख अशी एकूण 4 नखे कोयता आणि सुरीच्या साहाय्याने कापून लपवून ठेवल्याचे सांगितले. या प्रकरणी वन अधिकाराऱ्यांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन 4 नखे 1 पायाचा पंजा व गुन्ह्यात वापरलेले 2 सुरे जप्त कले आहेत.