पिंपळवंडी : पिंपरी पेंढार येथे बिबट्याने महिलेवर हल्ला करून ठार केले होते. या घटनेनंतर वनखात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले होते. या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे.
पिंपरी पेंढार येथील पीरपट शिवारात बुधवारी. (दि.९) पहाटेच्या सुमारास सुजाता रवींद्र डेरे या बेचाळीस वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करुन ठार केले. या घटनेनंतर वनखात्याने बिबट्यांना पकडण्यासाठी तत्काळ मोहिम हाती घेतली होती. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरात आठ तर पिंपरी पेंढार शिवारात २२ असे एकूण ३० पिंजरे लावले होते.
तसेच बिबट्याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळाच्या आजूबाजूला पंधरा ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी सुमारे शंभर वनकर्मचारी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी (दि ११) पहाटेच्या सुमारास घटनास्थळापासून ५०० फूट अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात ६ वर्ष वयाच्या नर जातीच्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.