खोडद : मांजरवाडी बेलशेतमळा (ता.जुन्नर) येथे मंगळवारी (दि. ८) दत्ता थोरात यांच्या बटाट्याच्या शेताच्या बाजूला लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्याचा ५ महिने वयाचा बछडा पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या भागात बिबट्याची एक जोडी व बछडा वावर दिसत असल्याने या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावून बिबट जोडी व बछडा जेरबंद करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
शेताला पाणी देणे, रात्रीच्या वेळी ये-जा करणे या दरम्यान बिबट दर्शन नित्याचे झाले असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. जुन्नर वनविभाग यांच्या वतीने उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ, सुशांत भुजबळ तसेच मांजरवाडीचे उपसरपंच संतोष मोरे, पोलीस पाटील सचिन टावरे ग्राम सुरक्षा दलाचे जवान रामकृष्ण चोपडा, तुषार टेके, दत्ता थोरात, प्रमोद थोरात, शार्दुल थोरात यांनी बिबट्याला माणिक डोह बिबट निवारण केंद्र येथे नेण्यासाठी गाडीत भरून दिले.
दरम्यान, मांजरवाडी गावात आजमीतीस प्रत्येक मळ्यात व वस्तीवर बिबट्याचा वावर असल्याने भितीचे सावट वाढत चालले आहे. गावातील पाळीव छोटी जनावरे, कुत्री संभाळने अवघड झाले असून वन विभाग व शासनाने या समस्येचा तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.