शिक्रापूर: डिग्रजवाडी (ता. शिरुर) येथे वारंवार नागरिकांना बिबट्याचे दर्शन होऊन काही पशुधनांसह कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केला असताना अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. डिग्रजवाडीसह कोरेगाव भीमा, धानोरे, दरेकरवाडी परिसरातील नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. काही पशुधनांसह कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने वनविभागाने संभाजी गव्हाणे यांच्या शेतात पिंजरा लावलेला होता. अखेर बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबतची माहिती प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांना मिळताच शिरुर वनविभागाचे नियतक्षेत्र अधिकारी बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, वनविभाग रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी बिबट्याला ताब्यात घेतले.