नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील आळे येथील डावखरवाडीतील सागर आप्पाजी डावखर यांच्या शेतामध्ये वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. ८) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला आहे. वनक्षेत्रपाल लहू ठोकळे यांनी ही माहिती दिली. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या नर असून त्याचे वय सुमारे चार ते पाच वर्षे आहे. त्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.
आळे परिसरात गेल्या काही महिन्यांत बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याने अनेक शेतकऱ्यांची पाळीव कुत्री फस्त केली. काही शेतकऱ्यांच्या शेळ्याही फस्त केल्या. याबाबत वन विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रार केल्यामुळे वन खात्याने डावखर यांच्या उसाच्या शेतात दोन दिवसांपूर्वी पिंजरा लावला. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या या पिंजऱ्यात झालेला बिबट्या.
बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी द्या : नागरिकांची मागणी
जुन्नर तालुक्यातील वन विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पूर्वी कधीतरी एखादा बिबट्या दिसायचा. मात्र, आता बिबट्या दररोज कुठे ना कुठे हल्ला करत आहे. परिणामी, नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. वाढते हल्ले पाहता शासनाने वन विभागाला बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता बिबटप्रवण क्षेत्रामधून जोर धरू लागली आहे.
बिबट्या प्राणी मांजरकुळातील असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच बिबट्या हा जंगलात असलेला प्राणी गेल्या काही वर्षांपासून उसाच्या शेतात वावरू लागल्याने तो आता उसाचे क्षेत्र सोडायला तयार नाही. त्या ठिकाणी पोषक वातावरण व त्याला खाद्याची तत्काळ उपलब्धता होत असल्याने बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.