ओझर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील भोरवाडी (हिवरे बुद्रुक) येथे रविवारी (दि. १६) रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान गावठाण हद्दीतून मुख्य रस्त्याने घरी निघालेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये युवक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्या युवकास प्रतिबंधक लस दिली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.
हिवरे बुद्रुक येथे सायंकाळी पाऊस सुरू असताना येथील गावठाण हद्दीत वीज पुरवठा करणाऱ्या खांबावर वीज कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. याच दरम्यान भोरवाडी येथील युवक यश संदीप भोर (वय १७) गावातील मुख्य रस्त्याने पायी घरी निघाला असता, अचानक त्याच्यावर पाठीमागून बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात युवक जखमी झाला. याचवेळी रस्त्याकडेला उभे असलेले ग्रामस्थ संतोष भोर व समीर भोर यांनी प्रसंगावधान राखत रस्त्याच्या बाजूला पडलेल्या लाकडी काठ्या व दगडांनी बिबट्याला परतवून लावले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, वनपरिमंडल अधिकारी अनिता भुजबळ यांनी घटनास्थळी दाखल होत युवकास प्रथमोपचारासाठी नारायणगाव येथे नेले.