लोणी काळभोर : मागील दोन महिन्यांपासून बिबट्याचा पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, शिंदवणे, हिंगणगाव, टिळेकरवाडी, वळती व तरडे गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिबट्याने छोटे मोठे हल्ले करून अनेक जनावरे फस्त केली आहेत. बिबट्याने धुमाकूळ घातल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता बिबट्याने थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कुंजीरवस्ती येथे कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना आज रविवारी (ता.2) पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर कुंजीर यांची थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील कुंजीरवस्ती परिसरात शेती आहे. कुंजीर यांनी शेतातच घर बांधून तेथे कुटुंबासोबत राहत आहेत. त्यांनी घराची देखरेख करण्यासाठी एक कुत्राही पाळला आहे. कुंजीर यांनी शनिवारी (ता. 1) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास साखळी दोरखंडाने कुत्रा बांधला. आणि नेहमीप्रमाणे रात्री झोपून गेले.
दरम्यान, रविवारी (ता.2) पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास कुत्रा अचानक जोरजोराने भुंकू लागला. तेव्हा मयूर कुंजीर यांना जाग आली. त्यांनी घराची खिडकी उघडून पहिले असता, बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढविल्याचे दिसून आले. तेव्हा मयूर कुंजीर यांनी आरडओरड केल्यानंतर तेथून बिबट्या शेतातील उसाच्या दिशेने पळून गेला. त्यानंतर कुंजीर घराचा दरवाजा उघडून बाहेर आले. तेव्हा बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा खूप गंभीर जखमी झाला होता. सुदैवाने कुत्रा साखळीला बांधला असल्याने, बिबट्याला कुत्रा घेऊन जाता आले नाही. त्यामुळे कुत्र्याचे प्राण वाचले आहे. जखमी कुत्र्यावर जनावरांच्या डॉक्टरांकडून औषधोपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, पूर्व हवेलीत बिबट्याने एवढा मोठा धुमाकूळ घातला आहे. मात्र बिबट्याला जेरबंद करण्याचा कोणताही प्रयत्न वनविभागाने अद्याप केलेला नाही. वनविभागाचा हा निष्काळजीपणाचा कारभार सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मानवी वस्तीजवळ काही अंतरावर बिबट्या येऊनही वनविभाग कारवाईचे गांभीर्य दाखवत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
पिकांना पाणी देता येत नाही..
थेऊर परिसरात बिबट्याचा वापर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मेंढपाळ व पशूपालन करणार्यांना डोंगरावर गुरे-ढोरे चरण्यासाठी घेऊन जाणे कठीण झाले आहे. तसेच बिबट्याच्या भीतीने रात्रीचे पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने पिकांना पाणी असूनही पाणी देता येत नाही. अशी परिस्थिती पूर्व हवेलीत झाली आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण…
पूर्व हवेलीतील अनेक शेतकरी उपजीविकेसाठी शेळ्या-मेंढ्या पाळतात. त्यांच्यामध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या वास्तव्याने या भागात शेतकऱ्यांची गाळण उडाली आहे. तर शेतमजूर कामाला बाहेर पडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्याचे गांभीर्य नसल्याने वनविभागाची अकार्यक्षमता नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वन अधिकारी मंगेश सपकाळ म्हणाले, शेतकरी शेतात जात असताना बॅटरी सोबत असावी. शेतकऱ्याने हातात काठी, मोठ्याने आवाज करत किंवा मोबाईलवर गाणे वाजवीत चालले पाहिजे. त्यामुळे बिबट्याला कुणीतरी आल्याची चाहूल लागेल आणि तो पळून जाईल. ज्या ठिकाणी जनावरे बांधले जातात त्या ठिकाणी बंदिस्त गोठा आणि लाईटची व्यवस्था पाहिजे. बिबट्या अंधारात शिकार करतो त्यामुळे उजेड असला तर बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता कमी असते. लहान मुलांना एकटे सोडू नये. नागरिकांनी नेहमी सतर्क राहावे. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. असे आवाहन लोणी काळभोरचे वन अधिकारी मंगेश सपकाळ यांनी केले आहे.
थेऊरचे शेतकरी मयूर कुंजीर म्हणाले, बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचे मी स्वत: डोळ्याने पहिले आहे. तसेच शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे सुद्धा दिसून आले होते. जंगलात अन्न, पाण्याच्या कमतरतेमुळे बिबट्यांचा वावर आता लोकवस्तीत वाढलेला आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा.