ओतूर : रोहोकडी, ओतूर (ता. जुन्नर) येथील हांडेबन येथे झोपलेल्या मेंढपाळ महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. यात मेंढपाळ मीराबाई बिरु बरकडे या किरकोळ जखमी झाल्या. ओतूर (हांडेबन) येथील शेतकरी अंबादास डुंबरे यांच्या (गट क्र.२३१) सोयाबीनच्या शेतात मेंढपाळांचा मेंढयांसह रात्रीचा मुक्काम होता. रविवारी पहाटे बिबट्याने येथे मेंढ्यांच्या बाजूला झोपलेल्या मेंढपाळांच्या कुटुंबातील मिराबाई बरकडे या महिलेच्या उजव्या हाताला पंजा मारून ओढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सर्वजण उठल्याने व कुत्र्यांनी हल्ला केल्याने बिबट्या पळून गेल्याने लहान मुलाचा व महिलेचा जीव वाचला.
दरम्यान, बिबट्याने हल्ला केल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांना समजताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे वनरक्षक विश्वनाथ बेले, वनपाल सारिका बुट्टे व वनमजूर फुलचंद खंडागळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर जखमी महिलेला उपचारासाठी ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढे प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी नारायणगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान ओतूर व परिसर बिबट प्रवण क्षेत्र घोषित करण्यात आला असून बिबट्याची वाढती संख्या ही चिंतेची बाब बनली आहे. बिबट्यांचे मानवी व पशुधनावरील हल्ले हे दररोज वाढतच आहे. मात्र संभाव्य घटना टाळण्यासाठी आंबेगव्हान येथील प्रस्तावित बिबट सफारी प्रकल्प कामाला प्राधान्याने लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी. तसेच हे बिबटे जेरबंद करावेत, अशी मागणी ओतूरच्या माजी सरपंच लीला तांबे, ओतूर तंटामुक्तीचे अध्यक्ष जगवंतराव डुंबरे, प्रगतिशील शेतकरी पद्माकर नलावडे, दीपक गाढवे, हरी डुंबरे, उत्तम फापाळे, मिलिद डुंबरे, अविनाश घोगरे, बाबू गाढवे यांनी केली आहे.
ओतूर येथील हांडेबन रस्ता परिसरात दुचाकी चालकांना अनेकदा बिबट्यांचे दर्शन झाले आहे. या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असून वनविभागाने पाहणी करून बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावावा व ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.