महाळुंगे पडवळ : सद्या बिबट्याच्या हल्ल्यांची बरीच दहशत आहे. त्या अशातच एक घटना समोर आली आहे. महाळुंगे पडवळ येथील सुंभेमळ्यात लक्ष्मीबाई खंडू थोरात (वय ७०) या घरी टिव्ही पाहत होत्या. त्यावेळी घरात अचानकपणे बिबट्याने प्रवेश केला, पण आजीने प्रसंगावधान राखून प्रतिकार केल्यामुळे त्या स्वतःचा जीव वाचवू शकल्या. बिबटे तर आता अगदी घरात येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लक्ष्मीबाई घराचा दरवाजा उघडा ठेऊन शनिवारी (ता. ६) रात्री घरात एकट्या टीव्ही पाहत बसल्या होत्या. आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घरात प्रवेश केला, कशाचा तरी आवाज आल्याने आजी समोर पाहतात तर त्यांना दोन फुटांच्या अंतरावर बिबट्या उभा होता.
आजीने मोठ्याने आरडाओरड केली. त्यानंतर बिबट्याने तिथून पोबारा केला. लक्ष्मण थोरात, मोहन थोरात, भरत थोरात, अथर्व थोरात आदी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी दत्तात्रेय राजाराम थोरात यांच्या उसाच्या शेतात निघून जाताना बिबट्याला बघितले.
पिंजरा लावण्याची मागणी
लौकी, कळंब, चांडोली बुद्रूक आदी गावात बिबट्यांनी शेळ्या, मेंढ्या, बैलांचा फडशा पाडला आहे. कळंब येथील सुंभेमळ्यात अगदी घरात येऊन बिबटे हल्ले करू लागले आहेत. नागरिकांना अनेकदा बिबट्याने दिवसा दर्शन दिले आहे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वेळ रात्री आठची होती. मी टीव्ही पाहत होते, त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. अचानकपणे बिबट्या घरात केव्हा आला, ते मला समजलेच नाही. आवाज आल्याने फिरून पहिले, असता माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. गोंधळून न जाता धैयनि प्रतिकार केला म्हणून माझा जीव वाचला आहे.
– लक्ष्मीबाई थोरात