Leopard Attack : खडकवासला, (पुणे) : रानात चरायला घेऊन गेलेल्या गाईवर घरी परतत असताना एका बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक गाय व दोन कुत्रे मृत्यूमुखी पडल्याची घटना पाबे (ता. वेल्हे) परिसरात सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. Leopard Attack
मिळालेल्या माहितीनुसार, पाबे गावच्या परिसरात पुणे शहराकडे येणाऱ्या घाटरस्त्यावर तसेच आसपासच्या परिसरात घनदाट जंगलझाडी आहे. शेतकरी ज्ञानोबा विष्णू रेणुसे हे या ठिकाणी त्यांच्याजवळ असलेल्या गायी जंगलात चारण्यासाठी घेऊन गेले होते. सोमवारी सायंकाळी घरी येत असताना अचानक एका बिबट्याने गाईवर हल्ला केला आणि गाईला ठार मारले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी ज्ञानोबा विष्णू रेणुसे यांनी यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी वेल्हे यांच्याकडे नुकसान भरपाई मिळावी याची मागणी केली आहे. गावातील गावकरी दहशतीच्या वातावरणात आहेत. घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. दिवसाही भीती वाटत आहे. तातडीने या बिबट्याला तत्काळ जेरबंद करावे, अशी विनंती गावकरी करत आहेत.
दरम्यान, पावसाचे दिवस असल्याने वन्यप्राणी त्यांच्या निवासस्थानापासून बाहेर पडत आहेत. दाट जंगलवस्ती असल्याने शेतकऱ्यांनी पाळीव जनावरांना जास्त अडचणीच्या व निर्जन ठिकाणी चरायला नेण्याचा प्रयत्न करु नये. जनावरांची काळजी घ्यावी अशी माहिती वेल्हे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली.