पुणे : राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे. लिंबाचे नुकसान होत असून, शेतकरी बाजारात हिरवी, छोटे लिंबे पाठवत आहेत. त्यामुळे लिंबाच्या भावात घट झाली आहे. घाऊक बाजारात एका गोणीला दर्जानुसार ३०० ते १३०० भाव मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
बाजारात दररोज १५०० ते २००० गोण्यांची आवक होत आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त होती. किरकोळ बाजारात एका लिंबाची १० ते १५ रुपयांना विक्री करण्यात येत होती. परंतु, सध्या आवक वाढली असून, येणाऱ्या लिंबाचे प्रमाण हिरवे असल्याने लिंबाच्या भावात घसरण झाली आहे. दर वर्षी उन्हाळ्यात आंबट चवीच्या लिंबाला चांगले दर मिळत असतात. किरकोळ बाजारात काही दिवसांपूर्वी दहा ते पंधरा रुपयांना एक लिंबू या भावाने विक्री होणाऱ्या लिंबाची सध्या वीस रुपयांना सात, तर चाळीस रुपयांना दहा अशी विक्री करण्यात येत आहे. बाजारात महाराष्ट्रातून नगर, सोलापूर जिल्ह्यासह परराज्यातून हैदराबाद आणि चेन्नई येथून बाजारात लिंबाची आवक सुरू असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.