पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही तर काय होते, याचा प्रत्यय एका ६३ वर्षीय वकिलाला चांगलाच आला आहे. या वकिलाला त्याची पत्नी, भाऊ व भावजय यांनी काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. हि घटना जुन्नर तालुक्यातील बेलसर येथे ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी ६३ वर्षीय जेष्ठ वकिलाने जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन फिर्यादी यांची पत्नी, भाऊ व भावजयीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा वकिल हा व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी ते खिचडी खात असताना त्यांना त्यांच्या पक्षकाराचा फोन आला होता. ते त्यांना फोनवर बोलत असताना त्यांच्या पत्नीने कोणाचा फोन आला आहे, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी पत्नीला काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे पत्नीने त्यांच्या हातातून फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर फिर्यादी तिला म्हणाले की, तु माझा फोन कशासाठी हिसकावून घेत आहेस, मी पक्षकाराशी बोलत आहे. त्यावरून पत्नी व फिर्यादी यांच्यात बाचाबाची चालू झाली होती.
दरम्यान, त्यावेळी तिथे त्यांचा भाऊ व भावजयी आले. भावाने तुमचा वाद का सुरु आहे, असे म्हणत हातातील वेळूच्या काठीने फिर्यादीच्या मानेवर जोरात मारली. मात्र, फिर्यादी यांनी ती काठी पकडली. त्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. फिर्यादी यांना गंभीर जखमी केले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास जुन्नर पोलीस करीत आहेत.