दौंड (पुणे): पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे या शेतकरी महिलेचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचे सर्वजण समजत होते. परंतु, आता या घटनेतील सत्य परिस्थिती यवत पोलिसांनी सर्वांसमोर आणली आहे. शेतकरी लताबाई धावडे यांचा खून सतिलाल वाल्मिक मोरे आणि त्यांचा पुतण्या अनिल पोपट धावडे याने केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपी सतिलाल वाल्मिक मोरे (रा. सध्या कडेठाण, मुळ चाळीसगाव) व अनिल पोपट धावडे (रा. कडेठाण ता. दौंड) यांनी लताबाई धावडे यांचा खून करून हा खून अतिशय योजनाबद्ध पद्धतीने केला होता. लताबाई यांचा मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्यात झाला असे भासविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र, यवत पोलिसांनी अतिशय गुप्त पद्धतीने तपास करत यातील आरोपिंना जेरबंद केले आहे. आरोपी अनिल धावडे हा कडेठाणचा उपसरपंच असून त्यानेच साथीदाराच्या मदतीने हा खून केला आणि बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचल्याचे आता तपासात उघड झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिला शेतकरी लताबाई बबन धावडे (रा. कडेठाण. ता. दौंड. जि. पुणे) या 7 डिसेंबर 2024 रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात धावडे यांचा मृत्यू झाला असावा असे मानले जात होते. परंतु, ज्या जागी त्यांचा मृतदेह आढळून आला होता, तिथे शेजारी रक्ताने माखलेला एक दगड दिसत असल्याने पोलिसांचा संशय बळावत होता. परंतु, पोलिसांनी अतिशय गुप्तपद्धतीने तपास करून अखेर या खूनाच्या घटनेला वाचा फोडली आहे.
या घटनेतील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे तपास करीत असताना, धावडे यांचा कोणत्याही वन्य प्राण्याने हल्ला केल्यामुळे मृत्यू झाला नसल्याचा न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास सुरु केला असता आरोपींनी अनैतिक संबंधाच्या कारणावरून आपसात संगनमत करून लताबाई धावडे यांचा खून करण्याचा कट रचला. त्यानुसार त्यांचे तोंड व डोके दगडाने ठेचून त्यांचा खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच. संपांगे हे करीत आहेत.
सतीलाल मोरे याने उघड केले उपसरंचपचाचे पितळ
३ मार्च रोजी संशयित सतीलाल मोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान सतीलाल घडाघडा बोलू लागला. यामध्ये सतीलाल याने सांगितले की, अनिल धावडे आणि त्याची चुलती लता धावडे यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. ते शेतामध्ये वारंवार एकमेकांना भेटत होते. 7 डिसेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कडेठाण गावच्या हद्दीत अनिल धावडे यांच्या गोठ्यावर काम करत असताना त्यांनी मला बोलावले आणि सांगितले की, माझी चुलती लता बबन धावडे ही मला भेटायला येत नाही आणि वरून पैशाची मागणी करते. तुला मी दीड लाख रुपये देतो. आपण दोघे मिळून तिचा खून करू. तू मला मदत कर, असे म्हटल्यानंतर या दोघांनी जीवे मारण्याचा कट रचला. अनिल धावडे यांच्या सांगण्यावरून लता धावडे यांना ऊसाच्या शेताजवळ बोलावून तिचे तोंड दाबले. त्यांना बेशुद्ध केले आणि दोघांनी मिळून दगडाने चेहरा आणि डोके ठेचून खून केला. त्यानंतर अनिल धावडे यांनी मोरे याला सांगितले की, कोणी विचारले, तर बिबट्याने मारले असे सांग. बिबट्याने हल्ला केला आणि हल्ल्यात मृत्यू झाला असे बिंबवण्यात ते दोघेजण काही दिवस यशस्वी झाले होते.