पुणे : पुण्यात लहान मुलांना अंगणवाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा आणि अळ्या आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील जनता वसाहतीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. अशाप्रकराचा पोषण आहार देऊन सरकार मुलांच्या जीवाळी खेळत आहे, असा आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकात्मिक बाल योजना अंतर्गत अंगणवाडीमधील मुलांना देण्यात येणाऱ्या खाद्यात अळया आणि उंदराच्या लेंड्या आढळल्या आहेत. एकात्मिक बाल योजना ही महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत येते. वाटप करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याने पाकीट फोडल्यानंतर पहिल्याच पाकिटात अळया आणि उंदरांच्या लेंड्या आढळल्या आहेत.
हा प्रकार जनता वसाहतमधील पान आळीमध्ये घडला आहे. राष्ट्रवादीच्या काँग्रेस रिक्षा संघटनाचे अध्यक्ष संदिप काळे यांनी ही घटना उघडकीस आणली आहे. सरकार लहान मुलांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत.