बापू मुळीक
सासवड(पुणे): पुरंदर तालुक्यामध्ये प्रस्तावित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाच्या हालचालींना वेग आला आहे. भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. काही दिवसांमध्ये या भूसंपादन अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1962 च्या कलम 32 (2 )ची अधिसूचना जारी केली जाणार आहे.
या अधिसूचनेनंतर विमानतळासाठी जागा निश्चित केलेल्या वनपुरी, उदाची वाडी, कुंभारवळण, एखतपुर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावातील सातबारा उताऱ्यावर भूसंपादनाचे शेरे यांची नोंद घालण्यात येणार आहे. पर्यायाने या सात गावातील जमीन खरेदी विक्रीवर बंदी येणार आहे.
भूसंपादनासाठी तीन उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर, या अधिकाऱ्यांकडून भूसंपादनाची 32 (2) ची अधिसूचना जारी होणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासकडून देण्यात आली आहे.
या अधिसूचनेनुसार जमीन मालकांना भूसंपादनाची नोटिस बजावण्यात येणार आहे. तसेच विमानतळाबाबत काही हरकती असतील तर आपले म्हणणे, मांडण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच या अधिसूचनेनुसार भूसंपादन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाण्याचा व पाहणी करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.
पारगाव या ठिकाणचे सर्वाधिक क्षेत्र संपादित होणार
या विमानतळासाठी सात गावांपैकी सर्वाधिक क्षेत्र हे पारगाव या ठिकाणचे संपादित होणार आहे. या गावातील 1542 सर्वे नंबर मधील 972 हेक्टर जागा संपादित होणार आहे. त्यानंतर खानवडी गावातील 381 सर्वे नंबर मधील 451 हेक्टर जागा, कुंभार वळण मधील 424 सर्वे नंबर मधील बाधित होत असून, या गावातील 341 हेक्टर क्षेत्राचे संपादन होणार आहे.
वनपुरी गावातील 362 सर्वे नंबर बाधित होत असून, त्यातील 330 हेक्टर जमीन, उदाची वाडी मधील 199 सर्वे नंबर मधील 240 हेक्टर जमीन, एखतपूर मधील 145 सर्वे नंबर बाधित होत असून, त्यातील 214 हेक्टर जमिन आणि मुंजवडी मधील 221 सर्वे नंबर मधील 122 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.