पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांना शुक्रवारी (दि. ४) पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये दाद मागितली होती. या न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार संबंधितांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.
ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी करणारा ललित पाटील पोलिसांचा बंदोबस्त असताना पळून गेला. पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याने पाटीलला पळून जाण्यास मदत झाल्याच्या ठपका ठेवून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलीस हवालदार रमेश जनार्दन काळे, नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.
पोलीस आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘मॅट’ मध्ये धाव घेतली. सुनावणीअखेर त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार त्यांचा पुन्हा एकदा पुणे पोलीस दलात समावेश करण्यात आला आहे. त्यांची नेमणूक नियंत्रण कक्षात तसेच पोलीस मुख्यालयात करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत.