पुणे : ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी पुण्यासह दौंडजवळील कुरकुंभ, सांगली जिल्ह्यातील कुपवाड, दिल्ली, बिहारमधील पटना, पश्चिम बंगाल येथे कारवाईवरुन तब्बल ५ हजार कोटींहून अधिक रक्कमेचा मेफेड्रॉनचा साठा जप्त केला होता. तसेच नाशिक जिल्ह्यातील कारखान्यावरही कारवाई केली होती. ही कारवाई करणार्या गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे व त्यांच्या पथकाला राज्य शासनाने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे़. त्याबाबतची अधिसुचना शासनाने जारी केली आहे.
ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना तेथून आपला ड्रग्सचा व्यवसाय चालवित असल्याचे एका छाप्यानंतर उघडकीस आले होते. त्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ललित पाटील हा पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमधून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे या प्रकरणाने देश ढवळून निघाला होता. त्याचा परिणाम पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने त्याची पाळेमुळे खणून काढताना अगदी दिल्ली, पश्चिम बंगाल, पाटणा येथे जाऊन मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त केला होता.
या पथकाला शासनाने २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हा निधी पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्त यांना वितरीत करावा आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईबाबत कामगिरची नोंद घेऊन ही रक्कम पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना देण्यात यावी, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. गुन्हे शाखेत त्या वेळी सहायक पोलीस आयुक्त म्हणून सतीश गोवेकर आणि सुनील तांबे हे कार्यरत होते. आता सतीश गोवेकर हे सेवानिवृत्त झाले आहेत तर सुनील तांबे हे विशेष शाखेत कार्यरत आहेत.