राहुलकुमार अवचट
यवत : येत्या १७ तारखेला मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण असल्याने इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव हे ‘ बकरी ईद ‘ सणाच्या निमित्ताने बकऱ्याची कुर्बानी देतात. या कुर्बानीसाठी यवतच्या आठवडे बाजारात लाखोंची उलाढाल होत मोठ्या प्रमाणात बोकड खरेदी – विक्री झाली. यवत येथील श्री महालक्ष्मी मंदिराशेजारी असलेल्या आवारात बोकड विक्रीसाठी झालेल्या गर्दीने बाजाराला जत्रेचे स्वरूप आले होते.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पहाटे पाच वाजल्यापासूनच बाजारात बकरे विक्रीसाठी आलेले होते .कुर्बानीसाठी घेण्यात आलेल्या बोकड खरेदी – विक्रीतून लाखों रुपयांची उलाढाल यवत बाजारात झाली असल्याची माहिती लिलाव चालक चंद्रकांत दोरगे यांनी दिली. तसेच २ हजारांपासून ते ६५ हजार रुपयापर्यंत बोली झाल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्र असलेल्या बोकडाला विशेष मागणी
चंद्र असलेल्या बोकडाला विशेष मागणी होती. साधारणपणे २० ते २५ हजार रुपये किंमतीपर्यंतच्या बोकडांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री झाली. त्यामुळेच बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बाजारात प्रचंड गर्दी झाल्याने काही व्यापाऱ्यांनी भुलेश्वर फाटा, दोरगेवाडी, मलभारे वस्ती फाटा या ठिकाणी वाहने थांबवून खरेदी केली.
पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, रायगड भागातील नागरिक आल्याने सेवा रस्त्यावर अनेक वेळा वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आजच्या बाजारात मोठ्या संख्येने खरेदीदार व विक्रीदार आल्याने यवत परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.