-बापू मुळीक
सासवड : पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेली पुरंदर उपसा जलसिंचन योजनेची पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. घटनास्थळी येवून योजनेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाया जाणारे पाणी येऊन बंद केले.
पुरंदर उपसा योजनेचा खेळ खंडोबा झालेला दिसून येत आहे. कधी पंप बंद पडतात, तर कधी पाईपलाईन फुटत आहे. यामुळे पाण्याच्या नियोजनावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन गंजलेली आहे. एयर वॉल खराब झाले आहे. त्यामुळे वारंवार अडचणी येतात. आज तर सकाळीच आठ वाजता आंबळे व टेकवडी गावच्या दरम्यान माळशिरस मेन लाईनवरील पिसर्वे लाईन फाट्यावर वॉल जवळ लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
पुरंदर उपसा योजनेची पाईपलाईन फुटल्याने पाण्याचे कारंजे निर्माण झाले. सध्या टोकाकडील गावांना अथक प्रयत्नानंतर पाणी सुरु झाले आहे. त्यामध्ये लाईनची तूट फूट झाल्याने पुन्हा पाणी लांबणीवर पडणार आहे. यासाठी एकच मोटर असल्याने जर राजेवाडी लाईनला पाणी गेल्यास पुन्हा मागील दिवस पाहिलेले आता पुन्हा पुढे पहावेच लागणार आहे.
यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला, जनावरांना कसे पाणी मिळणार हा प्रश्न पडला आहे. आता तरी पुरंदर तालुका सुजलाम- सुफलाम होईल का? हा तर सामान्य शेतकऱ्यांना प्रश्नच पडला आहे.