पुणे : पुण्यातील मुंढवा येथे सहाव्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नियोजित इमारतीचे बांधकाम करत असताना सहाव्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना मुंढवा येथील स्काय वन बिल्डींग या बांधकाम साईटवर घडली आहे. याप्रकरणी बांधकाम साईटवरील कॉन्ट्रॅक्टर आणि जागा मालक डेव्हलपर्स आणि इतरांवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ फेब्रुवारीला दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
रणधीर कुमार मेहता असं मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टर मोहन वसंत मालवडकर जागा मालक डेव्हलपर्स आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार अक्षय मोहन धुमाळ यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मुंढवा परिसरातील भिमनगर येथील स्काय वन बिल्डिंगचे बांधकाम सुरु आहे. मयत रणधीर मेहता हे या बांधकाम साईटवर मजूर म्हणून होते. ते गुरुवारी २२ फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सहाव्या मजल्यावर काम करत होते.
तेव्हा त्यांचा तोल जाऊन ते तळमजल्यावरील लिफ्टच्या बाजूला असलेल्या डक्ट मध्ये पडले. यामध्ये गंभीर जखमी होऊन रणधीर मेहता यांचा मृत्यू झाला. बांधकाम मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही साधनसामग्री न पुरविल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.