सागर जगदाळे
भिगवण : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तक्रारवाडीतील गडकर कुटुंबीयांनी सामाजिक विषयावर आधारित गौरी सजावटीसाठी देखावा साकारला आहे. दैनंदिन जीवनामध्ये वाढत चाललेला मोबाईलचा अतिवापर व त्यामुळे मुलांकडे होणारे दुर्लक्ष यावर या देखाव्यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. घरातील मोबाईलच्या वाढत्या प्रमाणामुळे लहान मुले खेळ, गप्पागोष्टी यांपासून दुरावत चालली आहेत.
घरातील संवाद हरवत चालला आहे. या ज्वलंत विषयावर प्रा. रवींद्र गडकर यांनी तयार केलेली घोषवाक्य हृदयाचा ठाव घेतात व देखावा पाहणाऱ्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडत आहेत. टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, संगणक यांचा वापर कमी करून मुलांसाठी अधिकाधिक वेळ द्यावा, त्यांच्याशी गप्पा माराव्यात त्यांना गोष्टी सांगाव्यात, त्यांच्याशी खेळावे, त्यांचा अभ्यास घ्यावा अशी अपेक्षा या देखाव्यातून व्यक्त केली आहे. देखावा पाहण्यासाठी भिगवण व तक्रारवाडी गावातील महिलांनी गर्दी केली व देखाव्याचे कौतुक केल्याचे रेश्मा गडकर यांनी सांगितले.