केडगाव: राज्यात नावलौकिक असणाऱ्या कुसेगाव (ता.दौंड) येथील श्री भानोबा देवाच्या यात्रेत निघणाऱ्या पालखी सोहळ्यात देव-दानव युद्ध झाले. यामध्ये दुसऱ्या दिवशी तब्बल 1275 दानव पडले. राज्यभरातून अनेक भाविक हे युद्ध पाहण्यासाठी आले होते. पुणे जिल्ह्यातील कुसेगाव येथे बुधवार आणि गुरुवारी देव-दानव युद्धाचा थरार पाहायला मिळाला.
या यात्रेत भाविकांनी भानोबा देवाचे मोठ्या भक्तीमय वातावरणात दर्शन घेतले. यात्रेच्या पहिल्या दिवशी भानोबा देवाच्या गाव प्रदक्षिणेच्या वेळी देव-दानव यांच्यात प्रतिकात्मक युद्ध झाले. या युद्धाच्या रणभूमीवर दानवांचे मुडदे पडले.
श्री क्षेत्र कुसेगाव येथील भानोबा देवाची यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. भानोबा देवाच्या यात्रेनिमित्त देवाचा अभिषेक, ओलांडा, पोवाडा, कुस्त्या, लोकनाट्य अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्याने अवघा परिसर भक्तिरसात चिंब झाला.