संदीप टुले
केडगाव : दौंड तालुक्यातील कुरकुंभ ‘एमआयडीसी’मधील अर्थ केमिकल कंपनीत एम.डी. ड्रग्सचे कनेक्शन असून, तब्बल १,४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ६०० किलो ड्रग्स सापडल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी (ता. २०) कुरकुंभ एमआयडीसी परिसरात पुणे शहर पोलिसांचा १० गाड्यांचा ताफा अचानक येऊन धडकला. या वेळी ही माहिती उघड झाली. अर्थ केमिकल कंपनीवर धाड पडल्याने, दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कुरकुंभ ‘एमआयडीसी’तील अर्थ केमिकल लॅबोरेटरी कंपनीमध्ये ड्रग्सचा साठा आणि उत्पादन होत असून, मोठ्या शहरांमध्ये याची वाहतूक केली जात असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. आज पुणे शहर पोलिसांनी कंपनीवर धाड टाकली असून, यामध्ये ५२ किलो मॅफेड्रॉन (एम डी) ड्रग्ज सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, सोमवारी पुण्यात पकडला गेलेला साठा हा कुरकुंभ येथील कंपनीशी निगडीत असल्यानेच ही धाड पडल्याची चर्चा आहे. कुरकुंभ एमआयडीसीत केमिकल झोन असून, यापूर्वी देखील अनेकवेळा काही कंपन्यांवर अशा प्रकारच्या धाडी टाकण्यात आल्या होत्या. या कंपनीत आणखी किती ड्रग्ज साठा आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, पुण्यामध्ये पोलिसांनी ड्रग्स पकडले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत २ कोटी रुपये असून, मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या दोन परदेशी ड्रग्ज पेडलरना त्याची विक्री वैभव माने, अजय कारोसिया आणि हैदर शेख हे तिघेजण करणार होते. याची सगळी माहिती मिळाल्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली आणि पुण्यात मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यातील सखोल तपासानंतर पोलिसांची नजर कुरकुंभकडे वळली आहे.